गैरहजर कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई; शिस्तीला प्राधान्य.

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
वैद्यकीय आरोग्य विभागात कार्यरत लिपिक अजय बेहनवाल यांना सतत गैरहजर राहणे आणि कार्यालयीन कामकाज योग्य प्रकारे न पार पाडल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने ही कारवाई करत शिस्तभंगासंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे.
कार्यालयीन जबाबदारीत कसूर
बेहनवाल यांची लिपिक म्हणून नियुक्ती कार्यालयीन आदेशानुसार करण्यात आली होती. त्यांच्यावर स्मशानभूमी क्र. ४ व ५ येथील मृत व्यक्तींच्या नोंदी ठेवणे, आवश्यक अहवाल सादर करणे आणि संबंधित कागदपत्रे पुणे येथे पाठविण्याची जबाबदारी होती. मात्र, त्यांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नसल्याने त्यांना दोन वेळा कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती.
त्यानंतर त्यांची नियुक्ती स्मशानभूमी क्र. १ व २ आणि दफनभूमी उल्हासनगर-१ येथे करण्यात आली. मात्र, येथेही त्यांनी कार्यपद्धतीत सुधारणा केली नाही. शिवाय, ते २४ डिसेंबर २०२४ पासून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गैरहजर असून, त्यांचा भ्रमणध्वनी देखील सतत बंद आढळला.
न्यायालयीन अटक वॉरंट आणि तक्रारी
अजय बेहनवाल यांच्याविरोधात अपर प्रधान न्यायाधीश, परिवार न्यायालय संकुल-२, आगरा येथील न्यायालयाने याचिका क्र. ११०७/२०२३ अन्वये अटक वॉरंट जारी केले असल्याचे प्रशासनाला कळविण्यात आले. तसेच, शिवसेना विभाग प्रमुख, उल्हासनगर-२ यांनी १० जानेवारी २०२५ रोजी अर्जाद्वारे तक्रार करत मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना होणाऱ्या गैरसोयीसाठी त्यांना जबाबदार ठरवले आहे.
निलंबनाची कारवाई
महानगरपालिकेने बेहनवाल यांच्या शिस्तभंगाच्या कृत्यांवर कठोर पाऊल उचलत, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक आणि शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ (१) अन्वये त्यांना निलंबित केले आहे. त्यांचा गैरहजेरीचा कालावधी विनावेतन राहणार असून, त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वियेत्तर सेवा व निलंबन काळातील प्रदाने) नियम १९८१ नुसार निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहील.
निलंबनाच्या कालावधीत त्यांचे सामान्य प्रशासन विभाग हे मुख्यालय राहील आणि सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगीशिवाय ते मुख्यालय सोडू शकणार नाहीत.
महापालिका प्रशासनाने ही कारवाई करत शिस्तीला प्राधान्य दिले असून, नागरी सेवकांनी जबाबदारीने आणि सचोटीने कार्य करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.