कल्याण – डोंबिवलीच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम: मोहीली जलशुध्दीकरण केंद्राच्या वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड

कल्याण : नीतू विश्वकर्मा
केडीएमसीच्या मोहीली जलशुद्धीकरण आणि उदंचन केंद्राच्या वीज वाहिनीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे कल्याण डोंबिवलीच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महावितरणकडून हा तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर केले जात असून ते होईपर्यंत कल्याण डोंबिवलीतील बहुतांश भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
केडीएमसीचे मोहिली उदंचन आणि मोहिली जलशुध्दीकरण केंद्र येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत टाटा पॉवर कांबा सबस्टेशन येथुन विद्युत पुरवठा केला जातो. हा विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीमध्ये काल (सोमवार दि. 05/08/2024 रोजी) रात्री बिघाड झाल्याने मोहिली केंद्रातून होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. या विद्युत वाहिनीवरील दुरुस्तीचे काम महावितरणमार्फत हाती घेण्यात आले आहे.
या भागांच्या पाणी पुरवठ्यावर झालाय परिणाम…
हे काम पूर्ण होईपर्यंत महापालिकेच्या मोहिली आणि नेतिवली जलशुध्दीकरण केंद्रामधून कल्याण (ग्रामिण) आणि डोंबिवली (पूर्व – पश्चिम) तसेच कल्याण पूर्व – पश्चिम विभागामधील भोईरवाडी, शहाड, रामबाग, चिकणघर, घोलपनगर, मिलिंदनगर, योगीधाम, मुरबाड रोड, अशोक नगर, वालधुनी, शिवाजी नगर, जोशी बाग, बिर्ला कॉलेज ते खडकपाडा रोड या भागात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.