Breaking NewsheadlineUlhasnagar

उल्हासनगर मनपाची MIDC आकारत असलेली पाणीपट्टीवरील सुमारे ४०० कोटींची थकबाकी माफ करण्याचा मोठा निर्णय.

 

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुक्तागिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत उल्हासनगर महानगरपालिकेच्या पाणीपट्टीची थकबाकी माफ करण्याचा आज महत्त्वपूर्ण निर्णय झाला.
उल्हासनगर महानगरपालिकेस एमआयडीसी मार्फत सुमारे 140 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.
उल्हासनगर महानगरपालिकेला  सुमारे 120 एम एल डी चा कोटा मंजूर असून त्यावरील 20 द.ल.लिटर पाण्यासाठी रुपये 12 प्रति हजार लिटर असा  दीडपट दर आकारण्यात येत होता. तो दर देखील रुपये 8 प्रति हजार लिटर असा करण्याचा निर्णय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे.
महानगरपालिकेस पूर्वीच्या मंजूर  कोट्यापेक्षा अधिकचे पाणी पुरवण्यासाठी एमआयडीसी जादा दराने देयक आकारत असल्याने व ते महानगरपालिका भरत नसल्याने वर्षांनुवर्षे महानगरपालिकेची थकबाकी वाढत चाललेली होती. यासाठी उद्योग मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दोन वेळा बैठका आयोजित करण्यात आल्या. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आज उद्योग मंत्र्यांकडे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये उल्हासनगर शहरासाठी अतिशय क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. महानगरपालिकेला पाणीपट्टी थकबाकी साठी विविध प्रकारचे दंडात्मक शुल्क एमआयडीसी आकारत होती. ते शुल्क आज रोजी सुमारे 400 कोटी पर्यंत वाढले असून असे दंडात्मक शुल्क  माफ करून मुद्दल सुमारे 200  कोटी रूपये पुढील दहा वर्षात योग्य हप्त्यात भरण्याची योजना एमआयडीसी ने करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले. त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेला जो मोठा भुर्दंड बसणार होता तो कमी झाला असून महानगरपालिकेचे व पर्यायाने नागरिकांचे करोडो रुपये वाचणार आहेत.
या बैठकीसाठी एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी बी‌.डी. मलिकनेर, अधीक्षक अभियंता सुधीर नागे,  महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त करूणा जुईकर व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, अभियंता बी एस पाटील इत्यादी उपस्थित होते.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार बालाजी किणीकर यांच्याकडे उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील माजी लोकप्रतिनिधी राजेंद्र चौधरी, अरूण आशान, कलवंत सिंग सहोता उर्फ बिट्टू भैया, भुल्लर महाराज व नाना बागुल इत्यादींनी पाणी प्रश्नासाठी पाठपुरावा केला होता. आजच्या बैठकीसाठी ते उपस्थित होते.

शहाड पंपिंग स्टेशन येथून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे शहरातील शहाड, शांतीनगर, विठ्ठलवाडी या भागात नेहमीच पाण्याची समस्या भासत होती ‌ यासाठी योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्याची निर्देश एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले.पाले येथील MIDC टॅपिंग पॉईंट वरून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे कॅम्प नंबर चार व पाच येथे एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे या ठिकाणी देखील पाणी वाढवून देण्याचे निर्देश उद्योग मंत्र्यांनी दिले.

एकंदरीत उल्हासनगर शहरासाठी उद्योग मंत्री उदय सामंत व खासदार डॉ श्रीकांत शिंदे व आमदार बालाजी किणीकर यांनी क्रांतिकारक निर्णय घेतला.

आयुक्त अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर महानगरपालिका विविध विकासकामांचे नियोजन करत असून हा क्रांतिकारी निर्णय महापालिकेच्या हिताचा असल्याने महानगरपालिकेचा पैसा वाचणार आहे व तो विकासासाठी वापरता येईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी यांनी दिली‌. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights