पक्षादेश शिरसावंद्य, मात्र कल्याण पश्चिमेतून आपणच प्रमुख दावेदार – आमदार विश्वनाथ भोईर यांचे सूतोवाच

कल्याण : नीतू विश्वकर्मा
आपल्यासाठी पक्षादेश शिरसावंद्य असून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्याने भाजपला ही जागा जाईल असे वाटत नाही. याठिकाणी आपण स्वतःच प्रमुख दावेदार असल्याचे सूतोवाच आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.
कल्याण डोंबिवलीतील प्रमुख पत्रकारांची संघटना असेलल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. या वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतील आव्हान, मतदारसंघात झालेली विकासकामे, राज्यातील राजकीय परिस्थितीनंतर बदललेले चित्र, महायुतीतील घटक पक्ष आदी महत्त्वाच्या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. तर कोवीड काळात गमावलेल्या राजेंद्र देवळेकर, दिपक सोनाळकर, प्रकाश पेणकर या आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या आठवणीने ते काहीसे भावूक झाल्याचेही दिसून आले.
शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि भरीव निधी आला…
आपण आमदार म्हणून निवडून आलो आणि त्याच्या पुढच्या काही महिन्यात कोवीडने संपूर्ण जग व्यापून टाकले. मात्र त्याकाळातही लोकांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र खरे सांगायचे तर आमचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि त्यानंतर कल्याण पश्चिमेत विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध झाला. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर केवळ कल्याण पश्चिमच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात कामाची गती प्राप्त झाल्याचे सांगत आपल्याला मिळालेल्या कार्यकाळात लोकांसाठी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याची प्रांजळ कबुली आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली.
यंदा कल्याण पश्चिमेत नवा इतिहास घडणार…
कोविडमुळे आमदार म्हणून काम करण्यासाठी पूर्ण पाच वर्षांचा वेळ मिळू शकला नाही. आणि आपण 100 टक्के सगळी कामे केली आहेत असेही आपले अजिबात म्हणणे नाहीये. मात्र राज्यातील सत्तांतरानंतर खऱ्या अर्थाने विकासकामांना गती मिळाली. एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये घेतलेले लोकाभिमुख निर्णय आणि आपण केलेली विकासकामे लोकांसमोर घेऊन जाणार आहोत. या कामांच्या बळावर जनता आपल्याला नक्कीच पुन्हा एकदा निवडून देईल. आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये नविन इतिहास लिहिला जाईल असा विश्वासही आमदार भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.