मतदार यादीत नाव नाही; विधानसभा निवडणुकीसाठी नोंदणी झाली सुरू,कल्याणातील त्या 70-80 हजार मतदारांची नावे होणार समाविष्ट.
कल्याण: नीतू विश्वकर्मा
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत यादीत नाव नसल्याने हजारो नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहिले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार निवडणूक आयोगाकडून यादीत नाव नसलेल्या मतदारांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परिणामी कल्याण पश्चिमेतील हजारो मतदारांच्या नाव नोंदणीचा मार्ग पुन्हा मोकळा झाला असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ कल्याण, डोंबिवलीमध्येच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात अनेक मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याचा प्रकार समोर आला होता. ही संख्या विधानसभानिहाय पाहायला गेल्यास एकट्या कल्याण पश्चिमेतील सुमारे 70 ते 80 हजार नागरिक मतदानाला मुकले होते. ठाणे जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक विधानसभेतही एवढ्याच मोठ्या संख्येने मतदारांची नावे यादीतून वगळल्याचे निदर्शनास आले होते.
या पार्श्वभूमीवर अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी वगळलेल्या मतदारांची नावे पुन्हा यादीत समविष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केली आणि नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात या विशेष नोंदणी मोहिमेबाबतची माहिती दिली. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून ही नावनोंदणी मोहीम सुरू झाली असून 25 जुलैपर्यंत ती चालणार आहे. तसेच या नावनोंदणीसाठी आपल्या घरी येणाऱ्या निवडणूक अधिकारी – कर्मचाऱ्यांना नागरिकांनी आवश्यक ते सहकार्य करावे आणि आपले नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे असे आवाहनही रवी पाटील यांनी यावेळी केले आहे.