कल्याणातील आधुनिक श्रावण बाळ; श्रावण मासात 55 आजी – आजोबांसह अनेकांना घडवतोय अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे दर्शन.

कल्याण : नीतू विश्वकर्मा
आपल्या संस्कृतीत श्रावण बाळाने स्वतःच्या वृद्ध आई वडिलांना घडवलेल्या तिर्थयात्रेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. याच धर्तीवर कल्याणातील एका आधुनिक श्रावण बाळाकडून श्रावण महिन्याचे औचित्य साधून 55 आजी – आजोबांसह अनेकांना अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी नेले जात आहे. निमित्त आहे ते माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नुकत्याच झालेल्या 55 व्या वाढदिवसाचे. नरेंद्र पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून काल रात्री कल्याणहून आयोध्येसाठी एक विशेष ट्रेन रवाना झाली.
श्रावण महिन्यामध्ये देवदर्शन आणि तिर्थयात्रेला विशेष असे महत्व आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने एक स्पेशल ट्रेन सोडण्यात आली. विशेष म्हणजे दहीहंडीच्या दिवशी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपला 55 वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने पवार यांच्याकडून कल्याणातील 55 आजी – आजोबांना या अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी नेण्यात येत आहे. या 55 वृद्ध दाम्पत्यासोबतच शहरातील धार्मिक संस्था, वारकरी सांप्रदाय, नरेंद्र महाराजांचे अनुयायी, कल्याणच्या स्वामी समर्थ मठातील भक्तगण, महिला मंडळे, भजनी मंडळे, नामांकित संस्थांचे पदाधिकारी, हास्य क्लब, जिम ग्रुप, मॉर्निंग वॉक ग्रुप असे मिळून तब्बल 1 हजार 200 भाविकांचा अयोध्या दर्शन यात्रेत सहभाग असल्याची माहिती आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली. तर श्रावण बाळाने ज्याप्रमाणे आपल्या आई वडिलांना तीर्थ यात्रा घडवली, नेमक्या त्या भावनेतूनच आपण कल्याणातील या 55 ज्येष्ठ नागरिक जोडप्यांना अयोध्येला दर्शनासाठी नेत असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली आहे.
तत्पूर्वी नरेंद्र पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून कल्याण स्टेशनवरून काल रात्री सोडण्यात आलेल्या या गाडीला कल्याणातील श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे गुरुवर्य परमानंद महाराज, वनवासी संवाद ट्रस्टचे आत्माराम (बाबा) जोशी, भाजप कल्याण जिल्हा अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष चंद्रभान महाराज सांगळे, यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण स्टेशन परिसर दुमदुमून गेला होता. कल्याण स्टेशनवरून काल रात्री रवाना झालेली ही ट्रेन उद्या अयोध्येला पोहचणार आहे.