उल्हासनगर शहर “डेंजर झोन” म्हणून काँग्रेसकडून घोषणा – जनजागृती अभियान राबवले



उल्हासनगर प्रतिनिधि : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर शहरातील जीवघेण्या खड्डेमय रस्त्यांमुळे उल्हासनगर महानगरपालिका हद्दीला “डेंजर झोन” (संकट क्षेत्र) घोषित करण्यात आल्याची घोषणा उल्हासनगर काँग्रेसतर्फे करण्यात आली. यानिमित्ताने आज शहरात जनजागृती अभियानही राबविण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत टाउन हॉल रोड, उल्हासनगर-३ येथे रस्त्यांवरील खड्ड्यांना ऑईल पेंटने सीमांकन करून त्यांची मोजणी करण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे स्पष्ट दिसावेत व अपघात टाळता यावेत हा उद्देश होता. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या चारही बाजूंनी उभे राहून विविध सूचना फलक दाखविले. त्या फलकांवर “संकट क्षेत्र – उल्हासनगर महानगरपालिका हद्द सुरू”, “Danger Zone – Enter at your own risk”, “अपने सेहत और गाड़ियों का ख्याल ख़ुद रखें, किसी भी नुक़सान के लिए उल्हासनगर महानगरपालिका ज़िम्मेदार नहीं” अशा प्रकारच्या सूचना लिहिलेल्या होत्या.
पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून उल्हासनगर काँग्रेसतर्फे खराब रस्त्यांविरोधात सातत्याने आंदोलन करण्यात आली आहेत. त्यात “डांबर खाते कोण”, “झंडू बाम वाटप”, “सीमेंट दान आंदोलन” अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. याचाच एक भाग म्हणून मागील मे महिन्यात नेताजी चौक येथे मोठे धरणे आंदोलनही करण्यात आले होते. उद्देश एकच – पावसाळ्यापूर्वी दर्जेदार रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, जेणेकरून गणेशोत्सव व नवरात्रीसारख्या सणकाळात नागरिकांना त्रास होऊ नये.
परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आजही परिस्थिती गंभीर आहे. रस्त्यांमुळे अनेक नागरिक जखमी झाले असून काहींनी आपला जीवही गमावला आहे. ज्येष्ठ नागरिकांना मणक्याचे आजार, महिलांना व इतर नागरिकांना दुखापती, तसेच वाहनचालक व रिक्षाचालकांच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरीही प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, अशी टीका साळवे यांनी केली.
स्थानिक संगीतकारांनी रस्त्यांवरील खड्ड्यांवर गाणी तयार करून राज्यभर प्रसिद्ध केली, तरीही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. म्हणूनच विरोधी पक्षाची जबाबदारी निभावत काँग्रेसतर्फे हे जनजागृती अभियान राबवण्यात आले असल्याचे साळवे यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर त्यांनी भाजप-शिवसेना यांच्यावर टीका करताना म्हटले की, महानगरपालिकेत अनेक वर्षे सत्ता असून केंद्र व राज्यातही सत्तास्थानी असतानाही नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांना अपयश आले आहे. ते केवळ गटबंधनाच्या राजकारणात गुंतले आहेत. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल, असा विश्वास साळवे यांनी व्यक्त केला.
या वेळी ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, नानिक आहुजा, प्रदेश सचिव कुलदीप ऐलसिंहनी, उपाध्यक्ष राजेश फक्के, बापू पगारे, फामिदा सय्यद, उषा गिरी, ईश्वर जागियाशी, सेल अध्यक्ष संतोष मिंडे, विशाल सोनवणे, पवन मिराणी, जयेश जाधव, वामदेव भोयर, विद्यार्थी अध्यक्ष रोहित ओव्हल, देव आठवले, राजकुमारी नारा, दीपक गायकवाड, रणजीत साळवे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.





