चांगले मित्र नसतील तर चांगली पुस्तकं सोबत ठेवा – शिक्षण अभ्यासक बिपिन पोटे
कल्याण : नीतू विश्वकर्मा
आजच्या काळात आपण कोणासोबत राहतो, त्यावर आपले भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे सोबत चांगले मित्र नसतील तर चांगली पुस्तकं जवळ ठेवा असा महत्त्वाचा सल्ला सुप्रसिद्ध शिक्षण अभ्यासक आणि पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनचे सी एम डी बिपिन पोटे यांनी विद्यार्थ्यांना दिला. पोटे ट्युटोरियलच्या जल्लोष 2024 कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन केले.
आताच्या काळात विद्यार्थ्यांसमोर पूर्वी कधी नव्हती एवढी स्पर्धा आहे. या स्पर्धेला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच मानसिक तयारी केली पाहिजे. तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उद्देश, नियोजन, मित्रांची संगत, सातत्य यासोबतच त्रास आणि आनंद या पाच गोष्टी महत्त्वाची भूमिका कशा बजावतात हे शिक्षण अभ्यासक बिपिन पोटे यांनी छोट्या छोट्या उदाहरणातून स्पष्ट केले.
अनेकदा क्षमता असूनही केवळ आपल्या कृतीमध्ये सातत्य न राखल्याने काही जण पुढे जात नाहीत. त्यामुळे आपल्या आयुष्याची गाडी योग्य ट्रॅकवर न्यायची असेल तर तुम्हाला पाठीमागच्या सीटवर नाही तर पुढच्या सिटवर बसून त्या गाडीचे स्टिअरिंग हाती घेतले पाहिजे. त्यासाठी आतापासूनच आपले मन आणि मेंदूला ट्रेन केले गेल्यास जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपण मिळवू शकत नाही अशा शब्दांत शिक्षण अभ्यासक बिपिन पोटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण केली.
दरम्यान यावेळी दहावी – बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, आशियातील सर्वात मोठ्या लॉजीस्टिक पार्क एसएम इन्फ्राचे सुमित म्हात्रे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोटे ट्युटोरियलचे ब्रँचहेड प्रभाकर माळी, नामदेव बागुल, कुणाल भानुशाली, विजय शिरसाठ, भूषण कुटे, निधी खिस्मातराव, मीनल मॅडम यांच्यासह पोटे ट्युटोरियलच्या टीमच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.