उल्हासनगर येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबीयांची आणि जखमी झालेल्या कामगाराची भेट घेण्यासाठी कल्याण लोकसभा खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे पोहोचले.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
शहाड येथील सेंच्युरी रेयॉन या कंपनीत शनिवारी झालेल्या रासायनिक टँकरच्या भीषण स्फोटात दुर्दैवाने चार कामगारांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेत काही कामगार जखमीदेखील झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज या कंपनीला भेट दिली. यावेळी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालक विभागाचे अधिकारी तसेच कंपनी व्यवस्थापन विभागाचे महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण घटनेची तातडीने चौकशी व्हावी यासाठी कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. या घटनेत मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबांना प्रत्येकी १३ लाख रुपये कंपनी व्यवस्थापनातर्फे देण्यात येणार आहेत. या कामगारांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी आणि त्यांच्या मुलांचे दहावीपर्यंतचे शिक्षणही कंपनी मार्फत केले जाणार असल्याचे यावेळी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. यामुळे दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबाच्या उदनिर्वाहाचा आणि मुलांच्या शिक्षणाचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. याच बरोबर सरकारच्या वतीने मृत कामगारांच्या कुटुंबांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. कंपनी व्यवस्थापनाच्या या बैठकीनंतर अपघातातील जखमी कामगारांची उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय येथे जाऊन भेट घेतली. सर्व कामगारांवर योग्य पद्धतीने उपचार करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या.
यावेळी आमदार कुमार आयलानी, उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांच्या समवेत कंपनी व्यवस्थापनाचे विविध अधिकारी उपस्थित होते.