कल्याणच्या कचोरे टेकडीवरील दरड कोसळली; सुदैवाने कोणाला दुखापत नाही.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
गेल्या तीन चार दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून आज दुपारी कल्याण पूर्वेतील कचोरे टेकडीवरील दरड कोसळण्याची घटना घडली. या टेकडीवरील मातीचा ढिगारा आणि भलामोठा दगड गडगडत खाली आला. मात्र सुदैवाने यामध्ये कोणाला दुखापत झाली नसून घराचेही नुकसान थोडक्यात टळले.
या कचोरे टेकडी परिसरात सुमारे 40 ते 50 कुटुंबांचे वास्तव्य असून केडीएमसी प्रशासनाकडून त्यांना दरड कोसळून अपघात होण्याची तसेच सुरक्षित ठिकाणी जाण्याची नोटीस बजावली आहे. तसेच केडीएमसीच्या शाळेमध्ये या नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही हे नागरिक आपले घर सोडून या तात्पुरत्या निवाऱ्यात जाण्यास तयार नाहीत.
दरम्यान या घटनेनंतर इथल्या रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून आज दुपारी हा प्रकार घडल्यानंतर केडीएमसी पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. आणि या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची विनंती केली आहे.