उल्हासनगर महापालिकेच्या शाळांचा कायापालट: “आदर्श शाळा” योजनेअंतर्गत विकास कार्य गतिमान.

Ulhasnagar- Neetu Vishwakarma
उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळा “आदर्श शाळा” म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवून महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले मनपा शाळा क्रमांक 17 (गोपाळ नगर, सी ब्लॉक, शहाड स्टेशन रोड) याचे बांधकाम प्रगत अवस्थेत असून, शअण्णा भाऊ साठे मनपा शाळा क्रमांक 24 (मराठी माध्यम) आणि स्वामी लीला शाह मनपा शाळा क्रमांक 18 (हिंदी माध्यम) यांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या जून 2025 पासून या नवीन सर्व सुविधायुक्त इमारतींमध्ये शैक्षणिक उपक्रम सुरू होतील.
महानगरपालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली शाळांचा कायापालट करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. शाळांना अत्याधुनिक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गुणवत्तेत वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये सर्व शाळांच्या इमारतींना एकसंध रंगसंगती देऊन त्यांचा देखील सांस्कृतिक व सौंदर्यात्मक विकास केला जात आहे.
“आदर्श शाळा” योजनेचा आढावा घेण्यासाठी शिक्षण विभागाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले मनपा शाळा क्रमांक 17 च्या बांधकामाची पाहणी केली. त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत याठिकाणी विविध सुविधांची तपासणी केली. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदारांना दिले.
या उपक्रमामुळे उल्हासनगर महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल आणि विद्यार्थी तसेच पालक वर्गाचा शाळांवर विश्वास वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.