राखीव भुखंडावरील अतिक्रमणा प्रकरणी अखेर मजीप्राला आली जाग,उगारला कारवाईचा बडगा.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
कुर्ला कँम्प, शिव मंदिर रोड,उल्हासनगर कँम्प नंबर -४ येथिल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या राखीव भुखंडावर अगोदर पासून अनेक भुमाफियांचा डोळा आहे.अगोदर या भुखंडावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीचा भुखंड असा फलक होता.पंरतु कालांतराने तो फलक गायब झाला.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निष्काळजीपणा मुळे अनेक दिवसांपासून मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या भुखंडावर नागरिकांनी कचरा टाकायला सुरुवात केली.त्यानंतर येथे डबर,डेब्रिज टाकले जाऊ लागले.यामुळे खड्ड्याच्या स्वरूपात असलेला हा भुखंड रस्त्याच्या समान पातळीवर आला व येथे टाकण्यात येणारा कचरा,डेब्रिज रस्त्यावर येऊ लागला त्यामुळे महानगरपालिकेने येथे कचरा टाकण्यास मनाईचे फलक लावले.तसेच येथील स्थानिक नगरसेविका डॉ. मिना सोंडे यांनी देखील येथे एक फलक लावून नागरिकांना कचरा न टाकण्याचे आवाहन केले होते. परंतु काही असामाजिक तत्वांनी तो फलक फाडून टाकला.मजीप्राचा हा राखीव भुखंड हडप होऊ नये म्हणून अनेकांनी आवाज उठवला परंतु मजीप्रा मात्र याबाबत दुर्लक्षित भुमिका स्विकारत असल्याने भुमाफियांचे फावत गेले.या भुखंडाला हडप करण्यासाठी भुमाफियांनी कधी महानगरपालिकेला तर कधी प्रांत कार्यालयाला सुद्धा हाताशी धरून डाव रचला आहे.
एका प्रकरणात तर महापालिकेचे माजी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या नावा सह सहीचा रोडारोडा व्यवस्थापनच्या अभियानाचा फलक याठिकाणी लावून हा भुखंड हडप करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते.सदरील प्रकार माझ्या निदर्शनास येताच मी तो डाव उधळून लावला.महापालिकेच्या नावाने याठिकाणी लावण्यात आलेल्या फलकाद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते की,नागरिकांनी दगड,वीटा,माती व वाळू इतरत्र कुठेही न टाकता स्वच्छता निरिक्षक नरेश परमार यांच्याशी संपर्क साधावा.जर नागरिकांनी इतरत्र कुठेही राडारोडा टाकला तर त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी सुचना करण्यात आली होती.याबाबत शंका उत्पन्न होईल असा हा सर्व प्रकार असल्याने याची शहानिशा करण्यासाठी मी स्वच्छता निरिक्षक नरेश परमार यांच्याशी संपर्क साधून या बाबत विचारना केली असताना त्याच्याकडून याप्रकरणी अगोदर सारवासारव करण्यात आली.नंतर हे अभियान राबविण्याकरिता घेण्यात आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कायदेशीर परवानगी,माजी आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या नावाचा जुना फलक लावण्याचे कारण याबाबत प्रश्न केले असताना धक्कादायक माहिती समोर आली.नागरिकांना कचरा टाकण्याची मनाई करण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला असल्याचे स्वच्छता निरिक्षक नरेश परमार यांच्याकडून त्यावेळी मला सांगण्यात आले.मी सदरील प्रकरणाची महापालिकेला तक्रार करताच महापालिकेच्या नावाने सुरू असलेले राडारोडा व्यवस्थापनाचे हे बनावट अभिमान तात्काळ गुंडाळण्यात आले.
यावरून हा राखीव भुखंड हडप करण्यासाठी भुमाफियांनी महापालिकेला हाताशी धरून हा राडारोडा व्यवस्थापनाच्या बनावट अभियानाचा डाव रचला असल्याचे दिसून आले.त्याचप्रकारे भुमाफियांनी प्रांत कार्यालयाला सुद्धा हाताशी धरून हा भुखंड हडप करण्याचा प्रयत्न केला आहे.हा भुखंड मजीप्राचा असून तो शासनाच्या मालकीचा असताना देखील यावर वैयक्तिक मालकी हक्क मिळवण्यासाठी बोगस सनद काढण्याचा प्रयत्न केला गेला.सोनी जॅाय वर्गीस आणि अभिजीत खडकबाण यांच्या नावाने सनद काढण्यात आली.त्यापैकी अभिजीत खडकबाण यांची सनद रद्द करण्यात आली असून सोनी जॅाय वर्गीस यांचे नावे असलेली सनद रद्द झाली नसल्याची माहिती आहे.अशातच या भुखंडावर अधुनमधून अनेक संशयास्पद घडामोडी घडत असताना आता या भुखंडावर एक कंन्टेनरची केबिन ठेवण्यात आली असून एक शेड बनवण्यात येऊन त्यात हाँटेल सुरू करण्यात आले असल्याचे दिसून येत असून भुमाफियांनी साम दाम दंड भेद याचा वापर करून हा राखीव भुखंड हडप करण्याचा जणू चंग बांधला असल्याचे दिसून येत आहे.
याविरोधात आतापर्यंत अनेक जणांनी आवाज उठवला असून मीही सातत्याने यावर समाजमाध्यमातुन लिहले आहे.आता राष्ट्र लोक पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी आणि प्रहार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अँड. स्वप्निल पाटिल यांनी याविषयी आवाज उठवल्यानंतर अखेर मजीप्राला जाग येऊन त्यांच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.राष्ट्र लोक पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी आणि प्रहार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अँड. स्वप्निल पाटिल यांच्या तक्रारीची दखल घेऊन मजीप्रा ठाणे कार्यालयाचे कार्यकारी अभियंता तन्मय कांबळे यांनी याठिकाणी भेट देऊन यावर झालेल्या अतिक्रमणाविरूद्ध आणि बोगस सनद प्रकरणात कारवाईचे संकेत देऊन तात्काळ याठिकाणी हा संपूर्ण भुखंड मजीप्राच्या मालकीचा असल्याचा फलक लावण्याच्या सुचना दिल्या त्याप्रमाणे आता याठिकाणी तसा फलक लावण्यात आला असल्याचे दिसून येत आहे.राष्ट्र लोक पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी आणि प्रहार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अँड. स्वप्निल पाटिल यांच्या तक्रारी नंतर अखेर मजीप्राने या राखीव भुखंडावर झालेल्या अतिक्रमणा विरूद्ध कारवाई केली असल्याने भुमाफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.