उल्हासनगर: ॲड. जय गायकवाड यांच्या पुढाकाराने पाणी समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आयुक्तांचे आश्वासन.

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत आमदार बालाजी किणीकर यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक १३ आणि १८ मधील पाणी प्रश्नावर ठाम भूमिका घेतली. त्यांनी आयुक्तांचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यासोबतच, पाणी कर वाढीचा पुनर्विचार करावा आणि ज्या ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठा होत नाही, तेथे नागरिकांना मोफत टँकर पुरविण्यात यावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
महानगरपालिका आयुक्तांनी संघटनेच्या मागण्यांचा विचार करून, ज्या भागांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा होत नाही, त्या ठिकाणी मोफत टँकर पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. तसेच, तातडीने बोअरवेल दुरुस्ती करण्यासह पाण्याच्या वापराचे आणि कनेक्शनचे ऑडिट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस शहरातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि मान्यवरांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. स्वराज्य संघटनेचे ॲड. राहुल बनकर, के. एस. ससाणे, अरुण काकळीस, आणि शशी सावंत यांचीही यावेळी उपस्थिती होती. या बैठकीत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.