उल्हासनगरमध्ये मनसेची आक्रमक भूमिका – बँकांमध्ये मराठी व्यवहार अनिवार्य करण्याची मागणी.

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठी भाषेचा सन्मान राखला जावा यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतर उल्हासनगरमधील बँक व्यवस्थापनाने इंग्रजीतील फलक स्वतःहून काढून टाकले असून, मराठी भाषेला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे.
मनसेचे महानगर संघटक मैनुद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध बँकांना भेटी देण्यात आल्या. त्यांनी बँक व्यवस्थापनाला रिझर्व्ह बँकेच्या नियमांची आठवण करून दिली, ज्यानुसार महाराष्ट्रातील बँकांमध्ये दैनंदिन व्यवहार आणि कामकाज मराठीतच होणे आवश्यक आहे. मात्र, काही बँका हा नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आल्याने मनसेने थेट कारवाईचा इशारा दिला.
मनसेच्या इशाऱ्यानंतर बँक प्रशासनाने त्वरित इंग्रजीतील फलक हटवले आणि मराठी भाषेला प्राधान्य देण्याची तयारी दर्शवली. तसेच, बँक कर्मचाऱ्यांना मराठी बोलणे अनिवार्य करण्याचे आणि एटीएममध्ये मराठी भाषा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी वाहतूक सेनेचे शहर संघटक काळू थोरात, विभाग अध्यक्ष कैलास वाघ, कैलास घोरपडे, शाखा अध्यक्ष दीपेश धारिवाल, राहुल राणे, तुकाराम थोरात, सुरेश माने, जगदीश माने, साहिल सय्यद आणि अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यातच अशा बँकांना जाब विचारण्याचे आदेश दिले होते, आणि त्या अनुषंगाने उल्हासनगरमध्ये ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीचा सन्मान राखला गेला नाही, तर मनसे अधिक तीव्र आंदोलन करेल, असा इशारा संघटक मैनुद्दीन शेख यांनी दिला आहे.