“१० दिवसांत खड्डे बुजवा, अन्यथा आमदार-खासदार कार्यालयासमोर खड्ड्यांत वृक्षारोपण!” — मनसेचा उल्हासनगर महानगरपालिकेला इशारा.



उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर शहरातील रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांचा प्रश्न आगामी १० दिवसांत मार्गी लावण्यात यावा, अन्यथा शहरातील आमदार आणि खासदार यांच्या कार्यालयासमोरील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल, असा कडक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे.
उल्हासनगर शहरात भुयारी गटारीच्या कामासाठी रस्ते खोदण्यात आले होते. मात्र, त्यानंतर केले गेलेले निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण आणि ढिसाळ कामामुळे शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, या जीवघेण्या खड्ड्यांमुळे यापूर्वी अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत.
दरवर्षी महानगरपालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, या निधीचा प्रत्यक्षात काहीच परिणाम दिसून येत नाही. यंदाही परिस्थिती ‘जैसे थे’ असून, निधीची उधळपट्टी करूनसुद्धा नागरिकांना त्या-त्या ठिकाणच्या खड्ड्यांचेच दर्शन होत आहे. परिणामी, उल्हासनगर महापालिका प्रशासन आणि शहरातील लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर नागरिकांच्या मनात तीव्र नाराजी आणि प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेचा कारभार सध्या राज्य शासनाने नियुक्त केलेल्या प्रशासकाच्या आदेशानुसार चालतो. मात्र, शहरातील आमदार आणि खासदार यांच्या निष्क्रियतेमुळेच नागरिकांना अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्याची भावना सामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने प्रशासनास स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, “पुढील १० दिवसांत रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास आमदार आणि खासदार यांच्या कार्यालयासमोर तसेच शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांत वृक्षारोपण केले जाईल.”
जर महापालिका प्रशासनास खरोखरच शहरवासीयांच्या जीविताची आणि आरोग्याची काळजी असेल, तर त्यांनी तात्काळ पावले उचलावी, अन्यथा मनसेच्या आंदोलनास सामोरे जाण्याची वेळ येईल, असा निर्वाणीचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनाच्या सूचना देण्यासाठी मनसेचे रस्ते व आस्थापना विभागाचे महानगर संघटक मैनुद्दीन शेख, वाहतूक सेनेचे शहर संघटक काळू थोरात, शहर सचिव बादशहा शेख, उपाध्यक्ष शैलेश पांडव, विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे, कैलास वाघ, शाखा अध्यक्ष संजय नार्वेकर, पांडुरंग गुंड आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.