आरक्षित भूखंडावर बहुमजली वाहनतळ उभारण्याची मनसेची मागणी — उल्हासनगरमधील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय करण्यासाठी महापालिकेकडे निवेदन.

उल्हासनगर प्रतिनिधि : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर : व्यापारी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगरमध्ये दररोज महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून हजारो नागरिक फर्निचर, कपडे, गोडरेज कपाटे तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, फर्निचर मार्केट, गोल मैदान रोड या परिसरात प्रचंड वर्दळ असली तरी गाड्या पार्क करण्यासाठी कोणतीही अधिकृत जागा उपलब्ध नसल्याने खरेदीदार व नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, महापालिकेचे एकही वाहनतळ नसल्याने नागरिकांच्या नाराजीला तोंड फुटले आहे.
नवीन विकास आराखड्यानुसार फर्निचर मार्केट, उल्हासनगर-३ मधील नवजीवन बँकेच्या बाजूला असलेला साईट क्रमांक १०९ (एम. एस. क्रमांक १८०) हा भूखंड वाहनतळासाठी राखीव आहे. या ठिकाणी जर महापालिकेने बहुमजली वाहनतळ उभारले, तर नागरिकांची गैरसोय कमी होईल, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल तसेच महापालिकेला उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल, असा ठाम दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
यासंदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे, उपशहराध्यक्ष सचिन बेंडके, मुकेश शेठ पलानी, रवी बाल, अनिल गोधळे, अक्षय धोत्रे, अमोल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उल्हासनगर महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले.
तसेच मध्यवर्ती रुग्णालय ते ईगल हॉटेल या रस्त्याचे सुरू असलेले काम देखील मनसेने प्रश्नांकित केले. गटार योजनेसाठी खणून काढलेला हा रस्ता सध्या नव्याने बांधला जात आहे. विकास आराखड्यानुसार हा रस्ता १८ मीटर (६० फूट) रुंदीचा असणे अपेक्षित असताना, ठेकेदाराच्या वतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनावश्यकरीत्या मोठे पादचारी मार्ग (फुटपाथ) ठेवून प्रत्यक्ष रस्ता अरुंद केला जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे भविष्यात वाहतुकीची समस्या अधिकच गंभीर होणार असून महापालिकेने तात्काळ हस्तक्षेप करून रस्ता आराखड्यानुसार रुंद करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मनसेने स्पष्ट केले की, “आरक्षित भूखंडावर बहुमजली वाहनतळ उभारणे आणि रस्ते आराखड्यानुसार रुंद करणे हाच वाहतूक कोंडीचा दीर्घकालीन तोडगा आहे. महापालिकेने तात्काळ पावले उचलून उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन उभारले जाईल.”