अधिसूचनेच्या अंमलबजावणीचा बोजवारा ! अवजड वाहतूक प्रवेशबंदीचे उल्लंघन सुरुच.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
बेळगाव येथे दुधाचा टँकर आणि कॉलेज बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात डीवाय पाटील कृषी महाविद्यालय कोल्हापुरातील १६ हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील भुतरामनहट्टी येथील प्राणीसंग्रहालयाजवळ ही धडक झाली.महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या अवजड वाहणांकडून अशाप्रकारे अपघाताच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत.परंतु शहरी भागात जेथे ठराविक वेळेकरिता अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असताना देखील या ठिकाणी अवजड वाहनांमुळे अपघात होण्याची संख्या जास्त आहे.
अरुंद रस्ते, वाढती अतिक्रमणे व अवजड वाहनांची रहदारी यामुळे उल्हासनगर शहराचा श्वास कोंडला आहे. चौकांमध्ये होणा-या वाहतूक कोंडीमुळे उल्हासनगरकरांना वारंवार अपघातांना सामोरे जावे लागते.आजवर अनेकांचे बळी गेले.अवजड वाहनांमुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी, जीवघेणे अपघात, यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने विधायक पाऊल उचलले.त्यानुसार शहरहद्दीतून मार्गक्रमण करण्यास अवजड वाहनांना कायमची प्रवेशबंदी झाली.अंतर्गत बाजारपेठेत येण्यासाठी अवजड वाहनांना रात्री १० वाजेनंतर प्रवेशाला मुभा मिळाली.प्रशासनाने ही अधिसूचना जारी केली खरी.पण, या अधिसूचनेची अंमलबजावणी करायची काेणी? अन् उल्लंघन होऊन शहरात अपघात घडला, तर त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर कोणाकडेही नाही.
आता शाळा सुरू झाल्या आहेत.उल्हासनगर शहरात बहुतेक शाळा ह्या रस्त्याच्या कडेला आहेत.या रस्त्या लगत असलेल्या शाळांमध्ये सुट्टी झाली की, मुलांची झुंबड उडते.मुल सैरभैर होतात क्षणभर वाहतूक कोंडी होते. अशावेळी या रस्त्यावरुन एखादे अवजड वाहण प्रवेश करतेवेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहरातील मुख्य मार्गांंवर शासकीय जिल्हा रुग्णालय, बाजारपेठा, बँका, दवाखाने, शाळा, महाविद्यालय असून दैनंदिन व्यवहाराकरिता येणारे जाणारे नागरिक, दवाखान्यात दवाउपचाराकरीता येणारे रुग्ण तसेच शाळेत येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी असते. त्यामुळे सदर मार्गावर वाहतूककोंडी होवून सामान्य नागरिकांना मनस्ताप व असुविधा होते. तसेच या व्यवसायिक अवजड वाहनांमुळे छोटे-मोठे अपघात, प्राणांतिक अपघात तसेच जीवितहानी सुद्धा झालेली आहे.