कल्याणात उसळली आयएमएची रेडवेव्ह ; रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण : नीतू विश्वकर्मा
डॉक्टर्स डे चे औचित्य साधून इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रेडवेव्ह – 2024 या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्याण पश्चिमेच्या गुरुदेव ग्रँड हॉटेलच्या प्रशस्त सभागृहात आयोजित या रक्तदान शिबिरात सामान्य रक्तदात्यांसह अनेक नामांकित डॉक्टर मंडळींनीही रक्तदान केले.
भारतात दरवर्षी 30 जून हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून इंडीयन मेडीकल असोसिएशन ऑफ कल्याणतर्फे 2001 पासून हे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी एक सामाजिक मुद्दा घेऊन त्याच्या संकल्पनेवर आधारित हे रक्तदान शिबिर भरवले जाते. यावेळी थॅलॅसीमियाग्रस्त मुलांसाठी हे शिबिर आयोजित केले गेले. ज्याद्वारे जमा होणारे रक्त हे कल्याण आणि आसपासच्या परिसरातील ब्लडबँकांना दिले जाणार असल्याची माहिती आयएमए कल्याणच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर यांनी दिली. आयएमएच्या आजच्या शिबिरात सुमारे 300 रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली.
तर अशा कार्यक्रमांतून समाजात डॉक्टरांबद्दल निर्माण होणारे नकारात्मक चित्र पुसण्याचे काम होत असल्याचा विश्वास महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी व्यक्त केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणचे उपाध्यक्ष डॉ. सोनाली पाटील , सचिव डॉ. शुभांगी चिटणीस, खजिनदार डॉ. विकास सूरंजे, डॉ. राजेश राजू, टास्क लीडर डॉ. ईशा पानसरे, डॉ. दीप्ती दीक्षित, डॉ. राहुल तिवारी, डॉ. अमित धर्माधिकारी, डॉ. अश्विन कक्कर, डॉ. तन्वी शहा यांनी विशेष परिश्रम घेतले.