उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.


उल्हासनगर – नीतू विश्वकर्मा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी उल्हासनगर-3 येथील मध्यवर्ती रुग्णालयात अत्यंत उत्साहात व अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय मजदूर कामगार युनियनचे अध्यक्ष श्री गोयल गुरुजी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वसंतराव मोरे, तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. सुचेता गोरे व डॉ. उत्कर्ष दुधेडिया उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व मेणबत्ती प्रज्वलनाने झाली. संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन तसेच पंचशील त्रिसरण स्वीकार करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात पत्रकार रामेश्वर गवई, अनिल अहिरे, मुन्ना मियाँ, राजू गायकवाड तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
कार्यक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बनसोडे यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यानंतर पत्रकार राजू गायकवाड व प्रमुख पाहुणे गोयल गुरुजी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
प्रमुख पाहुण्यांच्या प्रस्थानानंतर मेट्रन श्रीमती क्षीरसागर, डॉ. वसंतराव मोरे, डॉ. सुचेता गोरे, डॉ. उत्कर्ष दुधेडिया व श्री हरीश बागडे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचे स्मरण करून त्यांच्यावरील आपली श्रद्धा व्यक्त केली.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या एम.सी.ओ. डॉ. संजीवनी कांबळे व आरबीएसकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शालिनी तंत्रपाळे यांनी भीमगीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. बनसोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारसरणीवर प्रकाश टाकत भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सर्वांना सकारात्मक विचारांनी देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवा अध्यक्ष श्री नितीन गावंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री हरीश बागडे यांनी मानले.
या कार्यक्रमास वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.