


उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
२९ मार्च – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी उल्हासनगरचा दौरा केला. त्यांच्या आगमनानंतर मोठ्या जल्लोषात बँड, आतषबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात आले. हे स्वागत उल्हासनगर काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. श्याम मढवी यांच्या संपर्क कार्यालयाजवळ, सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या परिसरात पार पडले. या वेळी मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी तसेच शहाड गावठाण परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यानंतर, श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी नेहरू चौकातील उल्हासनगर काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. येथे ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, नाणिक आहुजा, सुनील बेहराणी, कुलदीप ऐलसिंघानी, शंकर आहुजा आणि अशेराम टीक यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी उल्हासनगरमधील प्रमुख पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
या भेटीनंतर, रिजेन्सी हॉटेल येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली, जिथे प्रदेशाध्यक्षांनी पक्षाच्या भविष्यातील कार्यपद्धती आणि उद्दिष्टांबाबत मार्गदर्शन केले.
या दौऱ्यात काँग्रेस पक्षाच्या विचारधारा व नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक मान्यवरांनी पक्षात प्रवेश केला. यामध्ये माजी सनदी अधिकारी व सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त श्री. समाधाम खरे, बहुजन समाज पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी श्री. अनिल गुडसुंदरे, शिक्षक पांडुरंग आपटे सर यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश आहे.
उल्हासनगर काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांनी या नवप्रवेशितांचे स्वागत करत पक्षवाढीसाठी त्यांचे मोलाचे योगदान लाभेल, असा विश्वास व्यक्त केला.

