






उल्हासनगर (प्रतिनिधी): नीतू विश्वकर्मा
महापुरुषांच्या संयुक्त जयंती आणि वैशाख बौद्ध पौर्णिमा निमित्त स्वराज्य संघटनेच्या वतीने आयोजित “धम्मपद – एक धम्मदेसना” या सांस्कृतिक कार्यक्रमास उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरात मोठी उत्स्फूर्त गर्दी झाली. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमात आयुष्यभर बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करणारे भंते डॉ. एन. आनंद महाथेरो यांना “शक्यमुनी पीस अवॉर्ड” देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच, भारतामधील पहिली डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट अकॅडमी व रिसर्च सेंटर तळोजामध्ये सुरू करणारे, आणि तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्वखर्चाने बसवण्याची घोषणा करणारे ॲड. गजानन चव्हाण (सदस्य, महाराष्ट्र व गोवा वकील परिषद) यांना भीमरत्न पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.
याशिवाय, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल खालील मान्यवरांचा देखील भीमरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला:
कल्याणजी घेटे (सहाय्यक पोलिस आयुक्त, कल्याण)
शैलेश काळे (सहाय्यक पोलिस आयुक्त, अंबरनाथ)
सुखदेव पाटील (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग)
लताताई पडघाण (बौद्ध धम्म प्रचारक)
कार्यक्रमात पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी “जात नाही, धर्म विचारला जातो” या विषयावर प्रभावी भाषण केले. त्यांनी सांगितले की, “जो माणूस बुद्धाचे पंचशील व अष्टांग मार्ग पाळतो, तो कधीच हिंसा करत नाही.” तसेच, सर्व धर्मीयांनी या मूल्यांचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी मेहनत घेतली, तर हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला.

