लाडकी बहीण योजनेचा पैसा जनतेचाच; सत्ताधाऱ्यांच्या खिशातला नव्हे।


उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
लाडकी बहीण योजनेचा पैसा सत्ताधारी आपल्या खिशातून देत नसून जनतेचाच पैसा जनतेला परत दिला जात आहे. परंतु अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांनी आदिवासी महिलांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कट आउटला राखी बांधून घेत केलेला पब्लिसिटी स्टंट अतिशय निंदनीय असल्याची टीका काँग्रेसचे उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांनी केली आहे.
हिंदू संस्कृतीप्रमाणे बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देत तिला स्वतःच्या कमाईतून ओवाळणी देतो. परंतु सध्या सरकारचा पैसा महिलांना देऊन जणू काही सत्ताधारी आपल्या खिशातूनच पैसे देत असल्याचे दाखवत आहेत. हा पैसा सरकारचा असून तो तुम्हाला देऊन कुणी लाभार्थी महिलांवर उपकार करत नाही. तर या महिला पात्र असल्यामुळे त्यांना हा लाभ मिळत असल्याचे सांगत रोहित साळवे यांनी शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
शिंदे गटाचे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांनी मुख्यमंत्र्यांचा एक कट आउट तयार केला असून तो ठिकठिकाणी फिरवला जात आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेल्या महिला भगिनींना मुख्यमंत्र्यांच्या या कट आऊटला राखी बांधायला सांगितले जात आहे. आदिवासी भगिनींकडून आमदार बालाजी किणीकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या या कटआऊटला राखी बांधून घेण्याचा प्रकार केला. पब्लिसिटी स्टंटसाठी केलेला हा प्रकार अतिशय निंदनीय असल्याची टीका काँग्रेसचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केली आहे.
सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयात अर्ज भरल्यानंतरच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो, असेही सध्या भासवले जात असून असे प्रकार आढळल्यास महिला भगिनींनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन रोहित साळवे यांनी केले आहे. तसेच मागील १५ वर्षात किणीकर यांना या महिला भगिनींची फक्त निवडणुकीलाच आठवण का येते? असा सवालही रोहित साळवे त्यांनी विचारला असून सरकारचा पैसा देऊन स्वतःची पाठ थोपटून घेत प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रकार बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.